सुख दुःखांचे डोंगर मोठे..
फोडून टाकू पुढल्या जन्मी.
आता नाही जर भेटचं झाली...
भेटू आपण पुढल्या जन्मी.
त्या काळोख्या रातीलाही...
नितळ निळाई देऊ आपण.
बेरंग झाल्या दिशा आताच्या...
रंगू आपण पुढल्या जन्मी.
अपेक्षांचे,जातियतेचे..
निष्प्राण कलेवर फेकून देऊ.
माणूस म्हणून पुन्हा नव्याने...
भेटू आपण पुढल्या जन्मी.
मनात दाटून येतो जेंव्हा...
विरहाचा जो एक कवडसा.
पुन्हा गळ्याचा हुंदका होऊन...
भेटू आपण पुढल्या जन्मी.
या भुईला दान देण्या...
आभाळ होऊनी कोसळतांना.
दवबिंदुचा थेंब होऊनी.
भेटू आपण पुढल्या जन्मी.
तुझ्या ऋतूंचे धुंद सोहळे...
आठवतांना पाठवतांना.
निळ्या नभाची वीज होऊनी...
भेटू आपण पुढल्या जन्मी..


