एका संध्याकाळी तिला
घरी जावसच वाटेना
किती बसेस गेल्या तरी
ती जागची उठेना
तिचं हे वागणं
तिला स्वत:लाच पटेना
पण तरी उठून घरी जावं
असं तिला खरच वाटेना
नक्की आपलं घर कुठलं ?
हा प्रश्न तिचा सुटेना
अन तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल
असं गर्दीत कोणी भेटेना
रहदारी काय आपली
घरी जायच्या घाईत
अन ही लोटली जात होती
तिच्या विचारांच्या खाईत
लहानपण एका घरी
अन मोठेपणी दुसर्या घरी
हा नियम म्हणून तिला पटेना
अन ज्यानी दुसर्या घरी पाठवलं
ते घरही तिला आपलं वाटेना
एका संध्याकाळी खरच
तिला घरी जावसं वाटेना
रहदारी ओसरली अन रस्ते
सुने लागले पडायला
तसा तिच्या उरातला जिव
धड धड लागला उडायला
घर दिसत नव्हतं पण
घरचे दिसत होते
ती तिथेच होती बसून तरी
तरी ते समोर येऊन हसत होते
त्याना बघणं टाळण्यासाठी
पापणी तिची मिटेना
पण हे खरं की एका संध्याकाळी
तिला घरी जावसं वाटेना
जाता जाता भाजी घेणं तिचं
नेहमीचं काम होतं
आणि आता घाई करायची तर
घर खरच लांब होतं
ती स्वत:च्याच विचारात गर्क
पहात राहिली आकाश
अन कोणीतरी तिच्यापाशी
येऊन बसलं सावकाश
तिची लागलेली तंद्री त्याने
भंग होऊ दिली नाही
आणि कोणी शेजारी बसलय
हे तिच्या लक्षात आलं नाही
अन जेंव्हा लक्षात आलं
तेंव्हा लक्षात आलं सारं
अन नं विचारता तिच्या प्रश्नाचं
तिला उत्तर मिळालं खरं
तिचे भरून वाहिले डोळे
आणि भरून आला गळा
तिला कुशीत घेऊन बसला होता
तिचा वेडा खुळा
याला काही कळत नाही
असं नेहमी तिला वाटे
पण आज त्याने परतवून लावले
तिचे सारे आरोप खोटे
मग मात्र तिला
घाईनं निघावसं वाटलं
अन त्याला मात्र तिथेच जरा
निवांत बसावसं वाटलं
ती लटकं रागावत म्हणाली
तुला काही कळतं का नाही?
तो म्हणाला बघुया तुझ्या
प्रश्नाचं उत्तर तुला मिळतं का नाही?
खुदकन हसत ती म्हणाली
तुला काय माहीत?
तो म्हणाला उत्तर मिळाल्यावर
असे प्रश्न विचारायचे नाहीत
तुझ्यासाठीच तर ते घर
उभं केलं राणी
तू नसलीस तर त्या घराकडे
पाहील तरी का कोणी?
असे प्रश्न कधीच आपण
एकट्याने सोडवायचे नसतात
त्यासाठी मदतीला आपली माणसं असतात
आपल्या माणसासाठी आपण
घरी जायचं असतं
नाहीतर एखादं वेडं माणूस
उगाच विचार करत बसतं ॑..
....

