उत्साह कोल्हापूरच्या नसानसात.....

0
उत्साह तर कोल्हापूरकरांच्या नसानसांत भिनलेला! घर बांधायचं असो किंवा लग्न-बारसं असो; ते दणकेबाज झालंच पाहिजे, ही इथली मानसिकता. अशा कार्यक्रमात मानापमानाची नाटकं भलतीच रंगतात. शुभकार्याला बहिणीने घराला तोरणं आणून बांधायची, त्याबरोबर पाच-पन्नास मंडळींना पुरेल असा "गारवा' आणायचा. "गारवा' ही तर भन्नाट पदार्थांची रेलचेल. भाकरी, पाटवडी, अंबील, घुगऱ्या, दही-भात, शेंगदाण्याची चटणी, कांदा असं दुरड्या भरून, वाजत-गाजत बहिणीनं तोरण घेऊन यायचं. भावाच्या घराचा उंबरा धुऊन ते चौकटीला बांधायचं. मग आप्तेष्टांनी यथेच्छ ताव मारायचा.

लग्न ही तर आठ-दहा दिवसांची बेजमी म्हणायला हरकत नाही. हळद जात्यावर दळायला आजूबाजूच्या बायका-मुलींना जमवायला सुरुवात झाल्यापासून मुहूर्तमेढ, लग्नाचा चुडा, गुगुळ, हळदी, साखरपुडा, अक्षता, लग्न, वरात, गोंधळ, जागर ते हळद काढण्यापर्यंतचे सगळी विधी पार पाडायचं म्हटलं तरी दहा-पंधरा दिवस वातावरण उत्साहानं भारलेलं राहतं. उखाण्यांपासून वरातीतल्या पेंगेपर्यंत धम्माल मजा असते. लग्न ठरलं की याद्या करण्यासाठी ज्येष्ठ मंडळी चर्चेला बसतात. देण्या-घेण्याचे मुद्दे सुरू झाले की मुख्य मुद्दा असतो नवरा-नवरीचे पोषाख.

"मुलाचे कपडे कोण काढणार ?"

"मुलाचे कपडे मुलीकडच्यांनी काढावेत" आणि "मुलीचे कपडे मुलाकडच्यांनी काढावेत" हे ठरवलं जातं. पुढे बाजारपेठेत कपडे खरेदीला ही दोन्ही घरची मंडळी एकत्र येतात. परस्परांच्या आवडीने खरेदी होते. दुकानाबाहेर आमच्यासारखा ओळखीचा भेटला, की विचारपूस होते.

"काय, हिकडं कुठं ?''

"आमच्या भाच्याचं लग्न ठरलंय, म्हणून कापडं काढायला आलोय.''

 कापडं काढणं म्हणजे "खरेदी करणं' हा खास इथला अर्थ ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा कोल्हापुरी झुणका...

"मग कुठे काढली कापडं ?''

"मुलीचे चंद्ररूप वालावलकरमध्ये आणि मुलाचे रेमंडमध्ये.''

"मग ?''

"मग काय विचारतायसा ! दोघांची कापडं काढून सोळंकीत आइस्क्रीम खायला आलोय.''

आपण काय बोलतो, त्याचा अर्थ काय होतो याच्या परिणामांची पर्वा या अघळपघळ लोकांमध्ये नाही.

'चौकश्या' करणं हा इथल्या  रिकामटेकड्यांचा खास उद्योग.  खरं तर याला 'दुसऱ्याची मापं काढणं' असा वाक्‌प्रचार अस्तित्वात आहे. अशा वाक्‌प्रचाराप्रमाणेच अनेक विशेषणं, क्रियापदं, अनेकवचनं यांच्याही खास शैली इथे रुजल्या आहेत.

'पॅन्टी शिवायला टाकल्यात, त्या आणायला निघालोय' असं वाक्य   इथे सहज कानावर पडतं. 'पॅन्ट'चं अनेकवचन आमच्या कोल्हापूरा 'पॅन्ट्‌स' असं न होता 'पॅन्टी' होतं. 

कोल्हापुरी अस्सलपणा किंवा झणझणीतपणाबरोबर शिव्यांच्याही अनेक छटा इथे दिसतात. 'ए रांडंच्या' हे रागाच्या भरात जेवढं जोर घेऊन येतं, तेच 'काय रांड्या, कुठं गेलतंस ?' ही अगदी जिवाभावाच्या मित्राच्या चौकशीची सुरुवात असू शकते.  'ते रांडंचं...' असं दोघांनी चर्चा करताना तिसऱ्याबद्दल बोललेलं असतं; पण त्यात पुढे कौतुक, चेष्टा, टवाळी, सहानुभूती, प्रेम, आदर यापैकी काहीही असू शकतं.

म्हणजे...

'ते रांडंचं लई भारी पडलं बघ !'
'ते रांडंचं लई शिकलंय रे !'
'ते रांडंचं असंच राहिलं बघ !'
वगैरे... वगैरे... वगैरे !

पण काही म्हणा, जिवाभावाच्या मित्रानं आपल्याला तशी हाक नाही मारली तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं...

अघळपघळपणा आणि चेष्टा तर किती कोल्हापूरात... चेष्टा कुठं करावी यालाही इथं मर्यादा नाहीत.

एखाद्या अंत्ययात्रेत प्रेताला खांदा दिलेला समोरून येणाऱ्याला इथे सहज विचारून जातो, "काय  बसणार काय डब्बलशीट ?''

हे फक्त कोल्हापूरातच !

पुण्यामध्ये पत्ता शोधायचा, विचारायचा तर "जोशी इथे राहत नाहीत आणि कुठं राहतात हे इथं विचारू नये." अशी पाटी वाचायला मिळते. कोल्हापुरात मात्र बरोबर याच्या उलट !

चौकात किंवा कोपऱ्यावर उभ्या असलेल्या मंडळींना पत्ता विचारला तर ते त्या व्यक्तीची इतर माहिती विचारतील आणि एकमेकांत सांगतील..."आरं, त्या बॉबकटचा बाबा रे ! काळं गिड्डं रे ते !'' हे पत्ता विचारणाऱ्याच्या समोर होऊ शकतं. त्यापुढे पत्ता सांगून रिकामे.

"हे बघा, सरळ-स्ट्रेट जावा. पुढं एक गोल-सर्कल लागंल, तितनं लेफ्ट मारा (चालतानासुद्धा !). त्या बोळात एक पायपीचा (ट्यूबलाइटचा) डांब (खांब) लागंल. त्याच्या जरा पुढं गेला की पाण्याची चावी (नळ) दिसंल. तिथं बायका हायेतच; त्या त्यांच्याच!''

एवढं ऐकून गोंधळलेला पाहुणा आणखी गोंधळू नये म्हणून एखाद्या लहान मुलाला, "ए बारक्या, जा ह्यास्नी सोडून ये." असं सांगणार. हे सगळं 'आपल्या  गल्लीत' आलेल्या पाहुण्यांसाठी, हे लक्षात घ्यायचं. ते पाहुणे परत जाताना पुन्हा दिसलेच, तर "पावनं, गावलं नव्हं घर ?'' असं आवर्जून विचारणार आणि रिक्षाला हाक मारून पाहुण्यांना त्यात बसवून निरोप देणार.

कोल्हापूरच्या दुधाला येणारी सायसुद्धा इथल्या आपलेपणाच्या दाटपणाची ओळख देणारी आहे.

कोल्हापूरातून कुणी नोकरीसाठी बाहेर गेलं तरी ते दोन दिवसांसाठी तरी कोल्हापुराकडे त्यांचे पाय वळतातच... कोल्हापूरला येतानाच प्लॅन होतो. ठरलेले मित्र, ठरलेल्या जागा, ठराविक जेवण ! हे वर्षभराचं बॅटरी चार्जिंग असतं. अशी गावाकडे खेचून आणण्याची ताकद इथल्या वातावरणात आणि इथल्या माणसात आहे...

कोल्हापूरला जायचं म्हटलं की मन कसं हिरवंगार होऊन जातंय... सातारा, कराड, इस्लामपूर जसं जसं मागं पडतं आणि जसं किणी वाठारचा टोल नाका पास होतो तसं मग कोल्हापूरचे वारं घुमायला लागतं... पंचगंगेच्या पुलावर आलं की कोल्हापूर तुम्हांला कवळ्यात घेऊन... "ये रे भावा..." असं म्हणत आपलंसं करुन ठेवतंय !
Nad karycha nahi ✌

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top