कालची घोषणा ऐकुन काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना जेवढा आनंद झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद NDTV आणि India Today च्या अॅंकर्सला झाला होता ! तिकडे प्रिंट मेडियावाले ‘गिकु’ आणि ‘कुके’ तर हर्षवायुने गडबडा लोळत होते म्हणे... त्यांनी नव्या ‘दमाने’ अग्रलेख लिहायला घेतल्याचे कळते !
भारताच्या माजी गृहमंत्र्यांना तर ‘एका तासात’ तिच्यामधे स्व. इंदिरा गांधी दिसायला लागल्या ! (आजपर्यंत त्यांना राहुलमधे राजीव गांधी दिसायचे !). येत्या काही दिवसात ताईसाहेबांमधे कुणा-कुणाला काय-काय दिसेल याचा काही नेम नाही !
एक-दोन दिवसात तमाम ‘सनातनी-पुरोगामी-बुद्धिवंत-लेखक-कलावंत आणि पत्रकार’ मंडळींना ताईसाहेबांमधे भारताचे भावी ‘आशादायी-धर्मनिरपेक्ष-सुसंस्कृत-उच्चशिक्षित-प्रगल्भ (वगैरे -वगैरे)’ नेतृत्व दिसायला लागेल... त्यांनी केलेल्या (आणि बऱ्याच न केलेल्या) ‘समाजसेवेबद्दल’ टीव्ही चॅनल्सवर ‘चर्चासत्र’ सुरु होतील. सगळ्यात पुढे असतील आपले ‘व्यापक कटाचा भाग’ असलेले सुमार पत्रकार उर्फ ‘कुके’ !
खरं तर काॅंग्रेस कार्यकर्त्यांना ताईसाहेबांकडुन शिकण्यासारखं खूप काही आहे. एका रात्रीत पक्षाचा ‘एक सर्वसामान्य कार्यकर्ता’ ते ‘अखिल भारतीय जनरल सेक्रेटरी’ कसे व्हावे याचे त्या आदर्श उदाहरण आहेत ! अर्थात, याआधी त्यांचे आई-वडील-भाऊ यांनीही असेच ‘विक्रम’ केले आहेत म्हणा ! किंबहुना, त्यांच्या कुटुंबाची तशी विक्रमी ‘परंपराच’ आहे !
उत्तर प्रदेश मधे काॅंग्रेसच्या लोकसभेतील २ (खानदानी) जागा वाढून आता ८० होणार यावर गुलामांचे एकमत होईल... पवन खेरा, अभिषेक मनु सिंघवी, चतुर्वेदी ताई, सुरजेवाला वगैरे मंडळींना उत्तर प्रदेश मधे वाराणसीत खुद्द मोदींचा पराभव दिसु लागेल. ‘सेफाॅलाॅजिस्ट’ नावाची जमात नविन आकडेमोड करुन ताईसाहेबांच्या आगमनाने काॅंग्रेसची ‘टक्केवारी’ (मतांची !) कशी दिवसागणिक वाढतेय हे दाखवतील...
सद्धया ‘पुर्व उत्तर प्रदेश’ ची जबाबदारी दिली असली तरी जसजशी निवडणुक जवळ येईल तशी ताईसाहेबांच्या सभांसाठी ‘देशभरातून मागणी’ येईल ! प्रत्यक्ष निवडणुक संपेपर्यंत ताईसाहेबांना आपल्या घरादाराकडे आणि ‘सोज्वळ व पापभिरु’ पती कडे लक्ष द्यायलाही वेळ मिळणार नाही ! अर्थात, मोदी-शहा-संबित पात्रा-स्मृती ईराणी आणि तमाम भाजपावाले (आणि भक्त!) मात्र ताईसाहेबांना वारंवार त्यांच्या पतीदेवांची ‘आठवण’ करुन देतील !
निवडणुकांचे निकाल काय लागतील यावर बरेच काही अवलंबुन असेल. जर ही ‘नवी नोट’ चालली तर मग हळुच ‘जुनी नोट’ मागे घेतली जाईल ! यथावकाश ‘संस्थानाच्या प्रथेप्रमाणे’ ताईसाहेबांचा ‘राज्याभिषेकही’ होईल. ‘वंशपरंपरागत’ चालत आलेला ‘राजमुकुट’ ताईसाहेबांच्या मस्तकावर विराजमान होईल... मग ‘आईसाहेब’ इटलीच्या तिर्थयात्रेला तर ‘भाऊसाहेब’ कैलास मानसरोवराच्या चिंतन यात्रेला जायला मोकळे !
...पण जर निवडणुका हरले किंवा ताईसाहेबांमुळे काहीही फरक पडला नाही तर तो पराभव आपल्या शिरावर घ्यायला गुलामांची काही डोकी पुढे आणली जातील !
...कारण काॅंग्रेसमधे ‘मुकुट’ घालण्यासाठी आणि ‘शिरच्छेद’ करण्यासाठी वेगवेगळी डोकी वापरली जातात... ज्या डोक्यावर मुकुट असतो त्याचा शिरच्छेद होत नाही आणि ज्याचा शिरच्छेद करायचा असतो त्या डोक्यावर मुकुट चढवला जात नाही !
- वैभव डोलारे.

