"अज्जिबात चांगल्या नाहीत तुम्ही...
नाहीत आवडत तुम्ही मला.....!"
असं मोठयाने, चिडून म्हणत तो त्याच्या जागेवर जाऊन बसला.
अन् मी अवाक् होऊन बघत होते त्याचं हे रूप....!
एका क्षुल्लक कारणासाठी आपल्या एखाद्या विद्यार्थ्याने असं आणि इतकं उद्धटपणे रिऍक्ट व्हावं, हे माझ्यासाठी खूप आश्चर्याचं,
मन दुखावणारं, अन् काहीसं क्रोध आणणारं होतं!
त्याने मला असं म्हणणं , हे माझ्यातल्या शिक्षकाचं खूप मोठं अपयश होतं!
१७ वर्षांत आजतागायत असा आणि इतका वाईट अनुभव एकाही विद्यार्थ्याने दिला नव्हता!
खूप बेचैन होते मी चार दिवसांपासून..
पण स्वतःवर, स्वतःच्या 'शिक्षक' असण्यावर माझा नितांत विश्वास आहे...
या वाक्याच्या मुळाशी जाऊन,त्याची कारणमीमांसा जाणून, या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसवेना मला!
तर....
झालं असं की....
मागच्या काही दिवसांपासून दररोज लंच ब्रेक नंतर लगेच दर अर्ध्या अर्ध्या तासांनी तो बाथरूमला बाहेर जाण्यासाठी विचारायचा मला....
अन् त्याच्यामुळे शिकवताना मध्येच डिस्टर्ब व्हायचे मी.
त्या दिवशीही मी शिकवत असताना जागेवरून उठून हाताची करंगळी दाखवत तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला....
आता मात्र चिडून मी त्याला रागावले...
"आत्ताच तर ब्रेक झाला होता ना!
तुला बाहेर जाऊन timepass करायचा असतो ना...?
गेलास की १०-१५ मिनिटे तर बाहेरच असतोस...
बस जागेवर...!"
अन् यावर ते सुरुवातीचं , माझ्यातल्या शिक्षकाला गदागदा हलवून सोडणारं वाक्य ओटीत पडलं माझ्या...!
परत दुसऱ्या दिवशी त्याने तेच विचारण्याची हिम्मत केली...
पण आज मात्र मी थोडं सौम्यपणे घेतलं...
आणि जाण्याची परवानगी दिली...!
तिसऱ्या मजल्यावर आहे माझा वर्ग..
आणि प्रत्येक मजल्यावर टॉयलेट ची सोय..!
पण तो मात्र खाली गेला..
माझं आज बारकाईने लक्ष होतं त्याच्याकडे.
वरून वाकून पाहत होते मी त्याला.
अन् जे पाहिलं, ते खूपच अनपेक्षित होतं मला!
शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर त्याची बालवाडीतली बहीण बसली होती.
१ वाजता शाळा सुटुनही ती अजूनही इथेच होती.
तो तिच्या दप्तरातला त्याचा मध्यंतरात मिळालेल्या, जाणीवपूर्वक जास्तीची घेतलेल्या खिचडीचा डबा उघडून तिला भरवत होता!
परत आला.
आणखी अर्ध्या तासाने...
त्याचा तोच प्रश्न.....
माझा तोच सौम्य होकार..
त्याचं तिच्याकडे जाणं....
माझं वरून वाकून पाहणं...!
यावेळी तो तिला काहीतरी समजावत होता,
तिला झोप येत होती,
पण तो तिला झोपू देत नव्हता.
ओंजारत, गोंजारत होता..
"इकडे तिकडे कुठेही जाऊ नको,
इथेच बसून रहा,
मी अजून एकदा येतो",
असं (हातवाऱ्यांवरून)
म्हणत होता!
परत वर आला..
रोजच्याप्रमाणेच मला
"किती वाजलेत?" विचारले.
मी दररोज अडीच च्या पुढची वेळ सांगितल्यावर तिथून पुढे मात्र मन लावून अभ्यास करायचा..
(हे माझं रोजचं निरीक्षण!)
त्यानंतर दोन दिवस शाळेत आलाच नाही तो!
आज त्याची आई आली त्याला घेऊन.
तिच्याशी केलेल्या चर्चेअंती हे समजले की,
ती एक single mother आहे....
अलिखित घटस्फोटिता..!
आणि तिची ही दोन मुलं.
नुकतीच ती एका हॉस्पिटलमध्ये कामाला लागली आहे,
अन् सकाळची ओपीडी २.३० ला संपल्यावर मगच तिला तिथून सुट्टी मिळते.
तोवर मुलीची शाळा सुटते.
मग पुढील दीड तास आई येईपर्यंत ते ५ वर्षांचं लेकरू शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर बसतं....
माझ्या शाळेच्या आसऱ्याला!
आपल्या चिमुकल्या बाळासाठी माझ्या शाळेची पायरीही सुरक्षित वाटत होती त्या माऊलीला!
अन् आई येईपर्यंत तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती माझ्या वर्गातल्या त्या १० वर्षांच्या भावावर!
त्या दिवशी अचानक ताप आला होता त्याच्या बहिणीला...
अन् अशा परिस्थितीत ,
अशा या कडाक्याच्या थंडीत ती झोपी गेली होती त्या पायरीवरच...
झोपेत पायरीवरून पडून कपाळाला टेंगुळ आलं होतं तिच्या !
त्यामुळे पुढचे दोन दिवस आई कामाला गेल्यावर तिच्याजवळ बसून आजारपणात काळजी घेत होता तो तिची...
त्याच्या 'त्या' मला चिडून बोललेल्या वाक्यातली तीव्रता,त्यातली तगमग आज अधिक स्पष्टपणे जाणवली आहे मला..
खरंच....
का म्हणून आवडायला पाहिजे होते मी त्याला??
किती कठोर वागले होते मी त्याच्याशी,
त्याच्यातल्या जबाबदार, पण हतबल भावाशी....!
असो,
(मुख्याध्यापकांच्या अलिखित परवानगीने)
*उद्यापासून त्याची ती गोंडस, गुबगुबीत बहीण तिची शाळा सुटल्यावर दीड तास माझ्या वर्गातल्या शिल्लक डेस्कवर बसणार आहे...
*तो बाहेर जाण्यासाठी मला वारंवार विचारणार नाही..
*मला व इतर मुलांना डिस्टर्ब होणार नाही..
*तो व त्याची आई कुठल्याही भीती व विवंचनेखाली दीड तास जगणार नाहीत ...
.....आवडेल ना आता तरी मी त्याला.....??

